Malegaon News : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता माजी पंतप्रधान, जनता दल (सेक्युलर) चे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार एचडी देवेगौडा यांनी कर्नाटकात भाजपशी जवळीक साधल्याने दिवंगत नेते निहाल अहमद यांची कन्या नाराज होती. आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जनता दल शहर जिल्हाध्यक्षा शान ए हिंद निहाल अहमद व सरचिटणीस मुश्तकिम डिग्निटी यांनी जनता दल पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी त्यांना पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत डॉ. हिरे म्हणाले, पक्षासाठी निहाल अहमद किंवा शान-ए-हिंद यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. परंतु, पक्षात त्यांच्यावर अन्याय झाला आहे. शिवसेना नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे. यामुळे तिथेच न्याय मिळतो.
दरम्यान, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोललो आहे. त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी होकार दिल्यास लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची ते भेट घेतील, असेही हिरे म्हणाले.
दरम्यान, शान-ए-हिंद म्हणाल्या की, जनता दल पक्ष श्रेष्ठींनी धर्मनिरपेक्षतेचा विचार सोडून भाजपसोबत जाण्याचे ठरविल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.
दरम्यान, निहाल अहमद हे महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण मंत्री होते. तसेच जनता दल (सेक्युलर) चे प्रदेशाध्यक्ष राहिले होते. तीन दशके त्यांनी विधानसभेत आमदारकी भूषवली होती. त्यांना मालेगावमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे.