दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. या ठिकाणी अपंग इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत घराबाहेर आढळून आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला असून भाच्यानेच मामाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलिसांनी भाच्यासह एकाला अटक केली आहे. खून करून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मयताच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मृतदेह विद्रूप झाला होता. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले होते.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी श्वानपथक, ठसे तज्ञ आणि न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा तपास केला. तसेच घटनास्थळी अनेक वस्तू देखील आढळून आल्या. यामुळे पोलिसांना संशय वाढला.
दरम्यान, घटनेच्या दिवशी मयताचा भाचा किरण शरद कदम (वय २०, रा. कोराटे, तालुका दिंडोरी) हा आणखी एका व्यक्तीसोबत आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे पोलिसांनी तसा तपास केला. घटनेच्यादिवशी दोघांनीही मयतासोबत दारू पिली.
नंतर मयत आणि किरण यांच्यात किरकोळ वाद झाला. यातूनच किरण याने चिडून कोयत्याने वार केले. किरण याने सोबत आणलेल्या पेट्रोलच्या कॅनमधील पेट्रोल मयताचे अंगावर टाकून त्यास पेटवून दिले.
नंतर ते दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस तपास करत होते. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.