पत्नी अन् सासू-सासऱ्यांना संपवून तरुण लेकरासह ठाण्यात, पोलिसांनी घरी जाऊन पाहिले तर…

आसाममधून एक भयानक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या पत्नीची आणि सासू-सासऱ्याची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत माहिती दिली आणि आत्मसमर्ण केले.

नाजीबूर रहमान बोरा असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने पोलिस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घडनास्थळी धाव घेतली. तिथे पोलिसांना तिघांचे मृतदेह आढळून आले आहे. नाजीबूर हा पोलिस ठाण्यात आला होता, तेव्हा त्याच्याकडे त्याचे नऊ महिन्याचे बाळही होते.

नाजीबूर हा मॅकेनिकल इंजिनियर आहे. तो जुन २०२० मध्ये संघमित्रा नावाच्या तरुणीच्या संपर्कात आला होता. फेसबूकवर त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही महिन्यानंतर ते कोलकात्याला पळून गेले आणि तिथे त्यांनी लग्न केले.

संघमित्राचे आईवडिल तिला पुन्हा घरी घेऊन आले. जानेवारी २०२२ मध्ये ते दोघे पुन्हा पळाले. यावेळी ते दोघे चेन्नईला गेले. तिथे ते जवळपास पाच महिने राहीले. त्यानंतर ते आसामला परतले. दोघेही नाजीबूरच्याच घरी राहू लागले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तिला मुलगा झाला होता.

त्यानंतर काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले. वादामुळे संघमित्राने नाजीबूरला सोडले आणि ती आपल्या आईवडिलांकडे राहू लागली. तिने नाजीबूरविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. नाजीबूरने मारहाण केल्याचे तिने तिक्रारीत म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

संघमित्राच्या तक्रारीमुळे नाजीबूरला एक महिना तुरुंगात राहावे लागले. जेव्हा तो सुटला तेव्हा त्याने संघमित्राची आणि मुलाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आईवडिलांनी त्याला भेटू दिले नाही. याप्रकरणी नाजीबूरच्या भावाने पोलिस ठाण्यात संघमित्रा आणि तिच्या कुटुंबाविरोधात तक्रारही दाखल केली होती.

नाजीबूर आपल्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला भेटू दिले जात नव्हते. २४ जुलैला दोन्ही कुटुंबामध्ये वादही झाला. त्यामुळे नाजीबूर संपातला होता. अखेर रागाच्या भरात त्याने पत्नी आणि तिच्या आईवडिलांचा जीव घेतला. त्यानंतर तो आपल्या ९ महिन्याच्या बाळाला घेऊन पोलिस ठाण्यात पोहचला आणि घटनाक्रम सांगत आत्मसमर्पण केले.