राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवडयात केले होते.
असे असताना प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. दोन्ही पैकी एक मतदार संघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे.
यामध्ये हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत मिळाल्याने २१ आणि २२ जानेवरीला मोठा कार्यक्रम घेत प्रचाराचा नारळच फोडण्याची जय्यत तयारी आवाडे यांच्या वतीने सुरू झाली आहे.
कोल्हापूर अथवा हातकणंगले यातील एक मतदार संघ कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्ष उत्सुक आहे. त्यासाठी कोल्हापुरातून धनंजय महाडिक, शौमिका महाडिक तर हातकणंगलेतून राहूल आवाडे, सुरेश हाळवणकर यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, २०१९ साली राहूल आवाडे शिवसेना अथवा भाजपच्या वतीने इच्छूक होते. मात्र त्यांना माघार घ्यावी लागली. आता त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
विद्यमान खासदार माने यांना पर्याय म्हणून राहुल यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदार संघात आवाडे गटाची चांगली ताकद आहे, यंत्रणा मोठी आहे. यामुळे ते शेट्टी यांना जोरदार टक्कर देतील असेही सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.