ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यात आणि पोलिस दलामध्ये जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने पोलिसांनी दिलेल्या त्रासामुळे जीवन संपवले आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हची केस लागल्यामुळे करिअर संपलं म्हणत त्याने आपलं जीवन संपवलं आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट परीसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मनिष उतेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. जीवन संपवण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहीली होती. त्यामध्ये त्याने काही वाहतूक पोलिसांची नावेही लिहीली आहे.
मनिष हा वागळे इस्टेटमध्ये राहत होता. तसेच तो आर्मी भरती आणि पोलिस भरतीसाठी तयारी करत होता. पण त्याचे स्वप्न भंगल्यामुळे त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परीसरातच एकच खळबळ उडाली आहे.
जीवन संपवण्याआधी त्याने एक नोट लिहीली होती. त्यामध्ये तो म्हणाला होता की, मी मनिष उतेकर गटारीच्या दिवशी माझी गाडी कोपरी ठाणे ईस्ट या भागात ट्राफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्री च्या वेळी ड्रिंक & ड्राइव्ह मध्ये पकडलेली.
मी आर्मी भरती पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे गाडी पकडलेली त्यात त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही उद्या या आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा गेलो माफी मागितली आणि काय असेल ते दंड तिथेच भरायला तयार होतो पण त्यांनी मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल माझ्या समोर कित्येक बाईक लाच घेऊन पैसे घेऊन सोडून दिले त्यांनी.
मी परत तिसऱ्या दिवशी गेलो माफी मागितली सांगितलं साहेब माझं करिअर सर्व संपून जाईल कोर्टात गेलो तर तुम्ही दंड काय असेल ते घ्या मी देतो हित ट्राफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी मला धमकी दिली तुझं करिअर च बरबाद करायचं आहे, भीती दाखवून दिली.
या सर्व भीती मुळे आज मी जीवन संपवत आहे. आज ही माझ्यावर वेळ आली उद्या अशी वेळ कोणावर यायला नको. मी सर्व ट्राफिक पोलिसांचा मान ठेवतो पण अस कधी कोणासोबत वागू नका जेणेकरून समोरचा माणूस प्रेशरमध्ये येऊन असे काही करेल म्हणून मी हे सर्व मेसेज करून ठेवत आहे आणि ती गाडी माझ्या मित्राची आहे त्यांची काही चुकी नाही बस ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्राफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आज जीवन संपवत आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मद्यपान करुन वाहन चालवण्याच्या केसेस कोर्टाकडे जात असतात. त्यामध्ये दंड देऊन सोडता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.