गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले, ६ जूनपर्यंतचा सरकारला वेळ दिलाय, त्यापूर्वी ४ जूनला मी आमरण उपोषण करतोय. पुन्हा मी मरायला तयार आहे आणि ६ जूनपर्यंत जर नाही निर्णय घेतला तर विधानसभेसाठी मी स्वतः मैदानात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते म्हणाले, मतदान हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे. सर्वांनी यासाठी बाहेर पडावे.
जो उमेदवार आपल्या सगे-सोयऱ्याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ज्याला पाडायचं त्याला पाडा, मी सांगणार नाही कुणाला निवडून आणायचे. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करा, असेही ते म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच ते म्हणाले, लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे, कोणाला मतदान करायचे आहे. माझ्या समाजाचं कल्याण होईल असं पाऊल मी उचलणार आहे, असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.
यामुळे आता मनोज जरांगे पाटील नेमकं कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात ते स्वतः राजकारणात उतरणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी लोकसभेसाठी मतदान सुरू आहे.