Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तसेच अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. यामुळे आता आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ते म्हणाले, गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते. पण आता माघार नाही. मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही अन् कानात कुजबूज करू दिली नाही. यामुळे लोकांचा पाठिंबा मिळत आहे.
समाजाशी गद्दारी न केल्यामुळे लाखो लोकांचे पाठबळ मिळत आहे. आंदोलनाचा रथ पुढे गेला असून, मराठा आरक्षणाशिवाय माघार नाही. असेही ते म्हणाले. यामुळे आता सरकारला दिलेली मुदत संपत चालली असून सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, ते म्हणाले मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असल्यामुळे कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत. सन १९२३ पासून आम्ही आरक्षणासाठी पात्र आहोत. हक्काचे आणि ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याची आमची मागणी आहे.
५० टक्क्यांवरील आरक्षण टिकत नाही, हे पक्के माहीत आहे. यामुळे आमची स्पष्ठ मागणी आहे. हक्काचे आरक्षण असताना आम्हाला ५० टक्क्यांपलीकडील आरक्षण का देता,’ असा सवाल केला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी विराट सभा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला लोकं उपस्थित होते. यामुळे आता सरकारने जर निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या काळात आम्ही अजून तीव्र आंदोलन करू असेही ते म्हणाले.