भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने गुरुवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मनोज तिवारीने २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 37 वर्षीय तिवारी 2015 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या तिवारी यांनी रणजी ट्रॉफी २०२२-२३ च्या अंतिम फेरीत बंगालचे नेतृत्व केले. मनोज तिवारीने इंस्टाग्रामवर लिहिले की, क्रिकेटच्या खेळाला अलविदा. या खेळाने मला सर्व काही दिले.
माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून जेव्हा मी अनेक आव्हानांना तोंड देत होतो, तेव्हापासून मी स्वप्नातही पाहिले नव्हते असे सर्व काही मला या खेळाने दिले आहे. या खेळाबद्दल आणि मला नेहमीच साथ देणाऱ्या देवाचाही सदैव ऋणी राहीन.
तिवारीने पुढे लिहिले की, माझ्या क्रिकेट प्रवासात ज्यांनी भूमिका बजावली त्या लोकांचे आभार मानण्याची ही संधी मी घेऊ इच्छितो. माझ्या लहानपणापासून ते शेवटच्या प्रशिक्षकापर्यंत मी सर्वांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्या क्रिकेटमधील यशात भूमिका बजावली.
माझे प्रशिक्षक मानबेंद्र घोष हे माझ्या वडिलांप्रमाणेच माझ्या क्रिकेट प्रवासाचे आधारस्तंभ होते. ते नसते तर मी क्रिकेट विश्वात कुठेही पोहोचलो नसतो. धन्यवाद सर आणि गेल्या काही दिवसांपासून तुमची तब्येत बरी नसल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी शुभेच्छा.
मनोज तिवारीने पुढे लिहिले की, माझ्या दोन्ही पालकांचे आभार, ज्यांनी माझ्यावर अभ्यासासाठी कधीही दबाव आणला नाही आणि मला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले. माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या पाठीशी उभी राहिलेल्या माझी पत्नी सुष्मिता रॉय हिचेही आभार. तिच्या पाठिंब्याशिवाय मी आज जिथे आहे तिथे पोहोचू शकलो नसतो.
मनोज तिवारी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मनोज तिवारीने 2008 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिवारीने भारतासाठी 12 एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे.