Maratha Reservation : माझी व्यथा समजून घ्या..; तरुणाने तहसीलदारांच्या कक्षात अंगावर डिझेल ओतलं अन्…

Maratha Reservation : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी तहसीलदारांच्या कक्षात स्वतःला कोंडून घेऊन एका तरुणाने आत्मदहन करण्यासाठी डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र धस असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी त्याने शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.

याबाबत माहिती अशी की, देवेंद्र धस याने शिराळा तहसीलदार यांच्या कक्षात जाऊन कक्ष खुर्च्या लावून बंद केला. कार्यालय सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नंतर तहसीलदार शामला खोत-पाटील या कार्यालयात आल्या.

त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावले. त्यांनी तहसीलदार कक्षात प्रवेश केला. मात्र दरवाजा आतून कडी नसल्याने खुर्च्या लावून बंद केला होता. पोलिसांनी दरवाजा बंद असल्याने खिडकीतून देवेंद्र धस यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बराच वेळ गेला.

त्यानंतर देवेंद्र यांनी तहसीलदार शामला खोत या एकट्याच आत याव्यात. त्यांनी माझ्या व्यथा समजून घ्याव्यात, अशी भूमिका घेतली. यावेळी तहसीलदार शामला खोत देखील आत गेल्या.

त्यांनी समजावून सांगितल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. नंतर देवेंद्र धस पुन्हा उपोषणास बसले. ते म्हणाले, पत्नीला आणि मला आजवर २० परीक्षा देऊनही २,४ गुण कमी पडल्याने नोकरीं मिळत नाही. आरक्षण असते तर यापूर्वीच नोकरी मिळाली असती.