शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे हे वादात सापडले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक नेते संताप व्यक्त करत असून अनेकांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
अमरावतीत महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे अनेक संघटना, पक्ष त्यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी ते करत आहे.
अशात एमआयएमनेही संभाजी भिडे यांना विरोध केला आहे. महापुरुषांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही. संभाजी भिडे यांची मिशी न कापता जो त्यांचे पाय तोडून आणेल त्यांना आम्ही दोन लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा एमआयएमने केली आहे.
आम्ही संभाजी भिडेंचा निषेध करतो. वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भिडे नथुराम गोडसे यांची अवलाद आहे. त्यांची मिशी न कापता त्यांचे दोन पाय जे तोडून आणतील त्यांना मी दोन लाख रुपयांचे बक्षीस देईन, असे युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी म्हटले आहे.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचा एमआयएमकडून तीव्र निषेध केला जात आहे. सोलापूरातील रेल्वे स्टेशनबाहेर तीव्र निषेध करण्यात आला आहे. त्यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक केला. तर केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
महात्मा गांधी हे थोर नेते होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदानही फार मोठे आहे. त्यांच्याविरोधात जर भिडे वादग्रस्त वक्तव्ये करत आहे तर ते देशद्रोही आहे. त्यांना पाठिशी घालणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो, असे प्रवक्ते कोमारो सय्यद यांनी म्हटले आहे.