सोशल मीडियावर अनेक रिल्स व्हायरल होत असतात. त्यामुळे नवनवीन रिल्स स्टार्स आता तयार होताना दिसत आहे. मराठी तरुण-तरुणीही यात मागे नाहीये. त्यांच्या देखील रिल्स व्हायरल होत असून कोटींच्या संख्येने त्यांचे चाहते निर्माण झाले आहे.
मंगळवारी मनसेचा विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन मंगळवारी पार पडला. यावेळी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिल्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या तरुण-तरुणींचा सत्कार करण्यात आला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या हाताने सर्वांचा सत्कार केला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व मराठी रिल्स स्टारांवर राज ठाकरे यांनी एक महत्वाची जबाबदारी दिली आहे.
राज ठाकरे हे व्यासपीठावर असताना त्यांनी विनायक माळी, अथर्व सुदामे यांना व्यासपीठावर बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्यांचे कौतूक करत त्यांना एक खास जबाबादारी दिली आहे. रिल्स हे खुप प्रभावी माध्यम असून तुम्ही समजात मोठा बदल घडवून आणू शकतात, असे राज ठाकरेंनी त्यांना म्हटले आहे.
इथे अनेक लोकं असतील. माफ करा मी भेदभाव करत नाही. मला समोर तो बसलेला दिसला म्हणून मी त्याला बोलावलं. मला फक्त तुम्हाला हे सांगायचंय की आज तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहे, त्यावर रिल्सच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सध्याचे राजकारण हे खुप खालच्या पातळीला चालले आहे. त्या खालच्या थरावर तुम्हाला जाण्याची गरज नाही. मी एक व्यंगचित्रकार असल्याने मला चिमटी कशी काढायची माहिती आहे. आता तुम्ही विनोदी पद्धतीने महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे जेणे करुन लोकांना त्याची जाणीव होईल, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
तुमच्यामध्ये संपुर्ण समाज गुंतवून ठेवण्याची ताकद आहे. तुमच्यामुळे माणूस आपली दुखे विसरताना दिसत आहे. मला असं वाटतं हे गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते आणि आता तुमचे देशावर मोठे ऋण आहे. तुम्ही नसता तर देशाचं काय झालं असतं माहिती नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.