रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली होती. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. २७ जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त झाली आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी तो घटनाक्रम सांगताना दिसून येत आहे. अनेकांनी त्यादिवशी नक्की काय घडलं हे सांगितलं. मोहन पारधी नावाच्या एका तरुणानेही त्याच्यासोबत काय घडलं होतं हे सांगितलं आहे. तो जखमी झाला होता तरी त्याने ६ जणांना वाचवल्याचे समोर आले आहे.
मोहन त्याच्या कुटुंबासह इर्शाळवाडीमध्ये राहत होता. आईवडिल, भाऊ, पत्नी, मुलगी असे सात जणांचे त्याचे कुटुंब होते. त्या रात्री सर्व निवांत होते. कोणालाही दरड पडेल असे वाटले नव्हते. पण रात्रीचे साडे दहा वाजले आणि मोठा आवाज झाला.
मोहनच्या घराचा भाग कोसळला होता. त्याच्या अंगावर तो भाग कोसळला होता. सुरुवातीला तो घाबरला पण त्यानंतर त्याने आईवडिल, पत्नी, मुलीला तिथून बाहेर काढले. घरातील सहा सदस्य सुखरुप होते. पण त्याचा एक १८ वर्षांचा भाऊ ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. कारण तो दुसऱ्या खोलीत झोपला होता.
मोहनने त्याला शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण त्याला तो सापडला नाही. तो ढिगाऱ्याखाली गेल्यामुळे मोहनला तो भेटणे कठीण होते. तसेच इर्शाळवाडीची परिस्थितीही भयानक झाली होती. त्याला काहीच सुचेनासे झाले होते.
मोहनला रात्रीच्या अंधारात अंदाज येत नव्हता की नक्की काय झालंय. पण त्याला हे माहिती होतं की खुप मोठं काहीतरी घडलं आहे. त्यामुळे कुटुंबाचा जीव धोक्यात न घालता. तो कुटुंबाला घेऊन खाली नानिवलीवाडी येथे आला. त्याला ही भयानक घटना सांगतानाही अंगावर काटा येत होता.