सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अनेक व्यापारी, नेत्यांवर कारवाई होताना दिसून येत आहे. तसेच कोणी टॅक्स बुडवला तर त्याच्यावर कारवाई होताना दिसते. आयकर विभाग नेहमी सेलिब्रिटी, नेते, व्यापारी यांच्यावरच लक्ष ठेवतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण त्यांचे सामान्य नागरिकांकडेही लक्ष असते. आज आपण त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहोत.
सध्या बँकेतील खात्यांचे प्रमाण वाढत आहे. बचत खाते आणि चालू खाते अशा दोन प्रकारचे खाते असतात. बचत खात्यामध्ये तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे जमा करु शकतात. त्यामध्ये तुमच्या पैशांना जास्त व्याज मिळते. त्यामुळे सामान्य लोक हेच खाते उघडून त्यामध्ये पैसे जमा करत असतात.
बचत खात्यामध्ये पैसे भरत असताना अनेकजण जास्ती रक्कम जमा करतात. त्यांना वाटते की यावर कर लागणार नाही. पण तसे नसते, त्यालाही एक मर्यादा असते. विशेष म्हणजे या खात्यांवरही आयकर विभागाचे लक्ष असते. जर खात्यातील रक्कम मर्यादेपेक्षा जास्त वाढली तर त्यावर कर द्यावा लागतो.
लोक आपण केलेली बचत या खात्यात जमा करत असतात. यामध्ये तुम्ही किती रक्कम जमा करता याला मर्यादा नसते. पण रक्कम जर आयकर व्याप्ती इतकी झाली तर मात्र त्यावर कर द्यावा लागतो.
आयकर रिटर्न भरताना तुम्हाला आयकर विभागाला सांगावे लागते की तुमच्या बचत खात्यामध्ये किती रक्कम आहे आणि त्याला तुम्हाला किती व्याज मिळते. ते व्याज तुमच्या उत्पन्नाशी जोडले जाते. जर तुमचे उत्पन्न १० लाख असेल आणि तुम्हाला मिळणारे व्याज हे १० हजार असेल तर तुमचे एकूण उत्पन्न १० लाख १० हजार रुपये असे मानले जाते.
एका आर्थिक वर्षामध्ये तुम्ही तुमच्या खात्यावर १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली. तर त्याबाबत तुम्हाला आयकर विभागाला माहिती देणे गरजेचे असते. कारण ते आयकर कक्षेत येते. पण तुम्ही माहिती दिली नाही तर तुमच्यावर आयकर विभाग कारवाई करु शकते.