मेजर लीग क्रिकेट (MLC) २०२३ चा फायनलचा सामना युएसएमध्ये पार पडला आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी एमआय न्यूयॉर्कने शानदार पद्धतीने विजय मिळवला. सामन्याचा हिरो निकोलस पूरन ठरला असून त्याने फक्त ४० चेंडूत शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे.
मेजर लीग क्रिकेटचा हा पहिला सिजन होता. या स्पर्धेचा अंतिम सामना एमआय न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झाला. या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेन पारनेलच्या नेतृत्वाखाली सिएटल संघाने ९ गडी गमावून १८३ धावा केल्या होत्या.
सिएटल संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक सलामीवीर क्विंटन डिकॉकने ५२ चेंडूत ८७ धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ९ चौकार लगावले. पण त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात न्यूयॉर्क संघाकडून ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी ३-३ बळी घेतले.
अशात १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूयॉर्क संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने खाते न उघडता स्टीव्हन टेलरच्या रूपाने पहिली विकेट गमावली होती. यानंतर कर्णधार निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि पुर्ण सामनाच फिरवला.
पूरनने या सामन्यात ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पूरनने या सामन्यात ५५ चेंडूत १३७ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने १३ षटकार आणि १० चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेटही २४९ होता.
निकोलस पूरनच्या खेळीमुळे एमआय न्यूयॉर्कने १६ षटकांत ३ गडी गमावून १८४ धावा करून सामना जिंकला. सिएटलच्या एकाही गोलंदाजाला पूरनला रोखता आले नाही. तर पाकिस्तानी गोलंदाज इमाद वसीम आणि कर्णधार वेन पुरनेल यांनाही केवळ १-१ विकेट घेता आली.
एमआय न्यूयॉर्कचा नियमित कर्णधार कायरन पोलार्ड सध्या दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतीमुळे तो एलिमिनेटर सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम आणि टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध खेळू शकला नाही. पोलार्डच्या अनुपस्थितीत निकोलस पूरनने संघाची धुरा सांभाळली आहे. पोलार्ड अंतिम सामन्यातही खेळला नाही.
दरम्यान, लॉस एंजेलिस नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स, सिएटल ऑर्कास, टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम हे या स्पर्धेतील सहा संघ आहेत. यातील बहुतेक संघ भारतीयांच्याच मालकीचे आहेत.