यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्या आहेत. असे असताना चंद्रपूरातील मुख्य गणेश विसर्जन याच दिवशी होणार आहे. त्यामुळे ईदच्या दिवशी निघणारी ईद-ए-मिलाद मिरवणूक दुसर्या दिवशी घेण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
त्यांच्या या मिरवणूकीत हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित असतात. दरम्यान, चंद्रपूर शहरातील मुख्य गणेश विसर्जन याच दिवशी होणार आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील सर्व मस्जिद कमिटीचे मौलाना व कमेटी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.
यामध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. याबाबत या बैठकीत शासकीय कार्यालयातील कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या मिरवणुकीत सहभागी होता यावे यासाठी सुट्टी जाहीर करावी, असे निवेदन पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.
यामुळे मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या बैठकीस अध्यक्ष मरकजी सिरतुन्नबी, सोहेल रजा शेख, सचिव मोहम्मद युसुफ कुरेशी, शहेजाद अहेमद, सैय्यद रमजान अली, रिजवान रजा, मोहम्मद सादीक, अब्दुल शकील कादरी, शेख इकबाल उपस्थित होते.
दरम्यान, अशा प्रकारे अनेक ठिकाणी निर्णय घेण्यात आले आहेत. हिंदू – मुस्लिम बांधवांच्या भाऊबंदकीला तडा जाईल, असे व्यक्तव्य राजकारणी करीत असतात. मात्र जीवाभावाचे नाते दोन्ही समाजाकडून जपले जाते.