Nagar news : साहेब, पाकिट भेटलंय, तुमचा वाटा कुठे पाठवू? करोडोंची लाच घेताना MIDC अधिकारी रंगेहात पकडला

Nagar news : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) एका अधिकाऱ्याला नगरमध्ये अटक करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. एका कंत्राटदाराकडून आपल्यासाठी आणि बदलून गेलेल्या वरिष्ठांसाठी एक कोटी रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने रात्री ही कारवाई केली आहे. सहायक अभियंता वर्ग २ अमित किशोर गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नगर एमआयडीसीमध्ये नियुक्तीला आहे.

तसेच तेथेच पूर्वी नियुक्तीला असलेले तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कंत्राटदार अरुण गुलाबराव मापारी यांनी त्यांच्या मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीमार्फत नगरच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी पाईपलाइनचे काम केले होते.

त्याचे २ कोटी ६६ लाख, ९९ हजार रुपयांचे बिल येणे बाकी होते. यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्या सह्या मिळवून बिल मंजूर करून देतो, असे सांगत गायकवाड याने आपल्यासाठी आणि वाघ यांच्यासाठी १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यामुळे कंत्राटदार मापारी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यामुळे ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील या कारवाईवर देखरेख ठेवून होते.

दरम्यान, गायकवाड आणि वाघ यांच्यासोबतच आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास सुरू आहे. एसीबी पथकाने फिर्यादीकडे पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तर इतर खेळण्यातील नोटा, अशा स्वरूपात एक कोटी रुपये वाटावेत अशा रकमेची बंडल तयार करून दिले होते.