Nagpur College Girl : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी महाविद्यालयात चालत जात असलेल्या तरुणीला कुऱ्हाडीच्या धाकावर जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
जामठा स्टेडियम परिसराजवळील जंगलात भरदिवसा ही घटना घडली. या तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला गंभीर दुखापत देखील केली. नंतर आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
ती तरुणी गावावरून बसने आली होती. नंतर महाविद्यालयात जाण्यासाठी ती तेथूनच पायी निघाली. लवकर पोहोचता यावे यासाठी तिने जंगलाजवळील निर्जन रस्ता धरला. मात्र याठिकाणी तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.
ही तरुणी तिच्या मोठ्या बहिणीशी फोनवर बोलत होती. आपला कुणीतरी पाठलाग करीत असल्याचे तिच्या लक्षात आल्याचे तिने तिच्या बहिणीला सांगितले देखील होते. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अचानक तिच्यासमोर आरोपी आला. त्याने कुऱ्हाडीच्या जोरावर तिला धमकावले. तिचा फोन हिसकावला तो फेकून तिला. तिला फरफटत जंगलात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला जखमी देखील केले.
दरम्यान, तरुणीची आरोपीशी झालेली झटापट तिच्या बहिणीने फोनवर ऐकली. बहिणीने तातडीने तरुणीच्या महाविद्यालयात फोन करून ही माहिती दिली. मात्र त्याठिकाणी जाईपर्यंत आरोपीने तेथून पलायन केले.
तरुणीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.