Nana Patekar : बनारसमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेले नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते सेल्फी काढताना एका तरुणाला थप्पड मारताना दिसत होते. यानंतर, स्पष्टीकरण देताना नानांनी संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आहे की त्यांनी त्या तरुणाला माफी मागण्यासाठी परत बोलावले होते.
याबाबत नाना पाटेकर म्हणाले की, व्हिडीओत दिसणारा मुलगा कोण आहे हे मला माहित नव्हतं? मला वाटलं की तो आमच्या क्रु मेंबर्सपैकी कोणी आहे. त्यामुळे त्या सीन प्रमाणे मी त्याला कानशिलात लगावली आणि त्याला जाण्यास सांगितले. त्यानंतर मला कळलं की तो आमच्या क्रुचा भाग नाही. त्यामुळे मी त्याला परत बोलावलं, पण तो पळून गेला.
मी कधीच कोणाला फोटो काढण्यास नकार दिलेला नाही. जे काही झालं ते चुकीचं आहे. काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही. त्याची मला माफी मागायची आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र तो सापडला नाही.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावर होत असलेल्या बदनामी पाहता नाना पाटेकर यांनी एका व्हिडिओ संदेशात स्पष्टीकरण दिले. या घटनेचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, तरुणाला थप्पड मारणे हे त्यांच्या चित्रपटातील एक दृश्य आहे.
तुळशीपूर येथील राज सोनकर हा तरुण दुपारी एक वाजता गंगेत स्नान करण्यासाठी दशाश्वमेध घाटाकडे निघाला होता. इथे जेव्हा त्याने शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांना पाहिले तेव्हा त्याचा विश्वास बसेना. यावेळी त्याने आपल्या आवडत्या कलाकारासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
तो सेल्फी घेण्यासाठी जात असताना बाऊन्सर्सनी त्याला अडवले पण तो गुपचूप त्यांच्या जवळ गेला. तेव्हा नाना पाटेकर यांनी त्यांना थप्पड मारून पाठवले. यानंतर बाऊन्सरने त्याला मिठी मारली आणि बाहेर ढकलले आणि तो तेथून परत गेला.