“संभाजी भिडेची मिशी कापून आणा अन् १ लाख रुपये बक्षीस मिळवा”; ‘या’ नेत्याची जाहीर ऑफर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ते वादात सापडले आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले होते.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. सर्व विरोधी पक्ष संभाजी भिडेंवर आक्रमक झाले आहे. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अशात समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष प्रमुख नवनाथ वाघमारे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला १ लाखांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांची घोषणा चर्चेचा विषय ठरली आहे.

संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचे काम सुरु केले आहे. ते महापुरुषांबाबत रोज वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य करत आहे. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी गोळा करुन एक लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे अनेक नेते आक्रमक झाले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी त्यांना अटक करावी. तसेच त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणीही नेते करत आहे.