भाजप आमदार नितेश राणे सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन थेट धमकी दिली होती. यामुळे आता त्यांच्या विरोधात येथील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे यांनी पुण्यात महापालिकेच्या बाहेर पुण्येश्वर मंदिर मुक्तीसाठी हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये आक्रमक भाषण केले होते. यामुळे याची मोठी चर्चा झाली होती.
भाषणात त्यांनी अधिकाऱ्यांचे मुस्काट फोडण्याची भाषा करत त्यांना दम दिला. यावेळी राणे म्हणाले होते की, घोडा हत्याराची भाषा आपल्याकडे नसते, आपण थेट कापतो. देश जर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो तर मग महापालिकेत खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे.
त्यांची खुर्ची खेचायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. देशात ८० टक्के हिंदू लोक राहतात, मग अधिकारी कशासाठी जिहादी लोकांचा लाड करतात? असा प्रश्न करत त्यांनी अधिकाऱ्यांना दम दिला होता.
दरम्यान, या सगळ्याविरोधात पुण्यातील महापालिका कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने निषेध आंदोलन करत नितेश राणे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी कर्मचारी म्हणाले, आम्ही नागरिकांच्या हितासाठी काम करतो, तुमची दादागिरी इथे चालणार नाही. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. नितेश राणे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना धमक्या देऊ नये. यामुळे हा वाद आता वाढला आहे.