बॉलिवूड हादरले! प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी संपवले जीवन; एनडी स्टुडिओमध्येच…

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी असे केले आहे.

कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी जीव दिला आहे. कर्मचारी काही कामानिमित्त स्टुडिओमध्ये गेले असता त्यांना नितीन देसाई अशा अवस्थेत दिसले. त्यानंतर लगेचच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आपला तपास सुरु केला आहे. नितीन देसाई यांनी असे का केले असावे? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. पण त्यांच्या जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

नितीन देसाई यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी भव्य सेट उभारले होते. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली होती. त्यानंतर त्यांनी देवदास, हम दिल दे चुके सनम, लगानसारख्या चित्रपटांचे सेट उभारले होते.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी मुंबईतल्या सर जे जे कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते बॉलिवूडमध्ये आले. त्यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास २० वर्षे काम केले. या २० वर्षांच्या काळात त्यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत आणि कलाकारांसोबत काम केले.

२००५ मध्ये नितीन देसाई यांनी कर्जतमध्ये ५२ एकरच्या जमिनीत एनडी स्टुडिओ उभारला होता. त्या स्टुडिओमध्ये जोधा अकबर, ट्राफिक सिग्नलसारख्या चित्रपटांचे शुटींग झाले तर बिग बॉससारख्या रिऍलिटी शोचे होस्टिंगही तिथे झाले आहे. त्यांनी चारवेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळवला होता.