तब्बल 13 दिवस गायब होते नितीन देसाई, घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती, वाचा ‘त्या’ घटनेबद्दल..

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टु़डिओमध्ये आपले जीवन संपवले आहे. वाढलेल्या कर्जामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

नितीन देसाई यांचा जन्म एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी फॉटोग्राफीचे शिक्षण घेतले होते. पण ते एकदा एका चित्रपटाच्या सेटवर गेले आणि आपल्यालाही काहीतरी असंच बनवायचं आहे हे त्यांनी ठरवलं होतं.

मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांची सुरुवात तमस या मालिकेपासून झाली होती. तर १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी त्यांनी असा सेट उभा केला होता. ज्यामुळे त्यांना फक्त देशातच नाही तर जगात ओळख मिळाली होती.

नितीन देसाई यांनी एका मुलाखतीत आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की मी एकदा कामात इतका गुंतून गेलो होतो की माझ्या कुटुंबाने पोलिस स्टेशनमध्ये मी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.

माझा ज्या घरात जन्म झाला तिथे सर्वांना वाटायचे की मी डॉक्टर, इंजिनियर व्हावं, पण मला कला क्षेत्रात जायचं होतं. त्यामुळे मी जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले होते. तिथून जेव्हा मी निघालो तेव्हा मला फोटोग्राफीचा छंद लागला होता, असे नितीन देसाई यांनी म्हटले होते.

तसेच ते पुढे म्हणाले होते की, जेव्हा मी कलादिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. तेव्हा मी माझ्या कामामध्ये खुप गुंतून जायचो. तमसच्या सेटवर तर मी १३ दिवस १३ रात्री काम केलं होतं. मी कामात खुप गुंतून गेलो होतो. त्यामुळे घरच्यांनी माझी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी तीन मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. पण २०१६ ला घेतलेले ते कर्ज वाढून २४९ कोटी झाले होते. कर्ज वाढत होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे.