लोकं हे डॉक्टरांना देव मानत असतात. कारण अनेकदा जीव जाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर जीवनदान देत असतात. नर्सही रुग्णांच्या उपचारात मदत करत असते. आता असा एक प्रसंग घडला आहे, ज्यामुळे परिचारिका चर्चेत आल्या आहेत. त्यांनी चालू बसमध्ये एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे.
चालत्या बसमध्ये एक व्यक्ती छातीच्या दुखण्यामुळे बेशुद्ध झाला होता. त्यावेळी काही शिकाऊ परिचारिकांनी त्यांचे प्राण वाचवले आहे. त्या नागपूरमधील सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी होत्या.
त्या परिचारिकांनी प्रसंगावधान राखून ५५ वर्षाच्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्यानंतर योग्य वेळेत त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करत उपचारही दिले आहे. परिचारिकांच्या या कामामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक केले जात आहे.
सीताबर्डी ते हिंगाणा अशी एक बस जात होती. त्यावेळी चालत्या बसमध्ये ५५ वर्षीय एका प्रवासाच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर बेशुद्ध होऊन ते अचानक खाली कोसळले. त्यामुळे संपुर्ण बसमध्येच गोंधळ उडाला होता.
लोकांना काय करावे हे समजत नव्हते. अशात काही लोक त्यांना पाणी द्यायचा प्रयत्न करत होते. पण तेवढ्यात त्या नर्सेस तिथे आल्या. त्यांनी त्या व्यक्तीला पाणी देऊ नका, असे सांगितले. त्यानंतर आपण नर्सिगच्या विद्यार्थीनी असल्याचे सांगत त्या व्यक्तीवर प्रथोमचार करण्यास सुरुवात केली.
जवळपास १० ते १५ मिनिटे त्या व्यक्तीला सीपीआर देण्यात आला. त्या परिचारिकांच्या उपचारामुळे ती व्यक्ती शुद्धीवर आली. त्यानंतर परिचारिकांनी बस रुग्णालयाकडे वळवण्यास सांगितली. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करुन याबाबत माहिती देण्यात आली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचवता आले आहे. भारती तिरबुडे, दिव्या फुंडे आणि सिमरन यादव, असे त्या तीन तरुणींचे नाव आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.