10 लाख भारतीय कावळे मारण्याचे आदेश! नेमकं कारण काय? सरकारचा मोठा निर्णय…

भारतीय वंशाचे कावळे मोठ्या प्रमाणात मारण्याची केनिया सरकारने घोषणा केली आहे. सरकारने 2024 च्या शेवटच्या सहा महिन्यांत 10 लाख कावळे नष्ट करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. कावळा त्यांच्या प्राथमिक परिसंस्थेचा भाग नाही. देशाच्या वन्यजीव विभागाने भारतीय वंशाच्या कावळ्यांना ‘आक्रमक परदेशी पक्षी’ म्हटले आहे.

हे कावळे अनेक दशकांपासून जनतेला त्रास देत असून स्थानिक पक्ष्यांना मारत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. हे कावळे मूळ पूर्व आफ्रिकेतील नाहीत, परंतु मोंबासा, मालिंदी, किलिफी आणि वाटमू या किनारी शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यांच्या मोठ्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन सरकारने १० लाख कावळे नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हॉटेल उद्योगाचे प्रतिनिधी आणि कावळे नियंत्रणात तज्ञ असलेल्या व्यावसायिकांचा समावेश असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कावळ्यांमुळे हॉटेल उद्योगात समस्या वन्यजीव प्राधिकरणाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की हे कावळे किनारपट्टीवरील शहरांमधील हॉटेल उद्योगासाठी मोठी समस्या बनत आहेत.

कावळ्यांमुळे पर्यटकांना उघड्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेता येत नाही. अशा परिस्थितीत हॉटेल उद्योगाशी संबंधित लोकही कावळ्यांमुळे हैराण झाले असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. केनिया वन्यजीव प्राधिकरणाने सांगितले की, कावळ्यांना मारण्याचा निर्णय सार्वजनिक हितासाठी घेण्यात आला आहे.

कावळ्यांमुळे अनेक पक्षी धोक्यात आले असून, ते अशा पक्ष्यांची सातत्याने शिकार करत असल्याचे वन्यजीव प्राधिकरणाने सांगितले. केनियातील पक्षीतज्ज्ञ कॉलिन जॅक्सन यांनी सांगितले की, हे कावळे लहान स्थानिक पक्ष्यांची घरटी नष्ट करतात आणि त्यांची अंडी आणि पिल्ले खातात.

त्यामुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत आहेत. स्थानिक पक्ष्यांच्या कमतरतेमुळे पर्यावरण रक्षणात अडचणी येत आहेत. कावळ्यांचा परिणाम अशा पक्ष्यांवरच होत नाही, तर संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.