अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच घटना झारखंडमध्येही घडली आहे. अधिकारी झालेल्या तरुणीला पहिल्याच दिवशी लाच घेताना पकडण्यात आले आहे. मिताली शर्मा असे तिचे नाव आहे.
मितालीने वयाच्या २१ व्या वर्षी झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली होती. पण पहिल्याच पोस्टिंगमध्ये ती लाच घेताना आढळून आली आहे. पैशाचा मोह न आवरता आल्यामुळे ती लाच घेताना पकडल्या गेली आहे.
लाचलुचपत विभागाच्या पथकाने मितालीला अटक केली आहे. तिला या विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. मितालीला स्पर्धा परिक्षेत १०८ वी रँक मिळाली होती. तेव्हा तिचे कुटुंब खुप आनंदी होते. पण आता मुलीला लाच घेताना पकडल्यामुळे त्यांना बाहेर तोंडही दाखवता येत नाहीये.
मिताली ही झारखंडच्या हजारीबाग येथील बडा बाजार परिसरातील रहिवासी आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला होता. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातीलच मुलगी आहे. तिच्या वडिलांचे नाव मुकेश शर्मा असे आहे.
मितालीची पहिली पोस्टिंग कोरडमा जिल्ह्यात झाली होती. तिला सहकार विभागात सहायक निबंधक म्हणून नेमून दिले होते. अशात कामाच्या पहिल्याच दिवशी तिला लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले आहे. ती १० हजार रुपयांची लाच घेत होती.
फिर्यादीचे नाव रामेश्वर प्रसाद आहे. मितालीने कोडरमा व्यापारी मंडळांची पाहणी केली होती. तेव्हा तिला काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे तिने या मंडळाचे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच स्पष्टीकरण टाळायचे असल्यास २० हजार रुपये द्यावी लागतील असे तिने सांगितले. त्यामुळे रामेश्वर प्रसाद यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर तिला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.