डोंबिवलीत मोलकरनीने मारला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला; चोरीची ‘ही’ जबरदस्त टेक्निक पाहून पोलिसही हैराण

शहरातील लोकांचे जीवन हे धावपळीचे जीवन म्हणून ओळखले जाते. दिवसभर काम आणि रात्री आराम असे त्यांचे आयुष्य असते. त्यामुळे घरात कामासाठी अनेकजण घरकाम करणाऱ्यांना कामाला ठेवत असतात. पण अनोळखी लोकांना कामाला ठेवणे किती महागात पडू शकते हे दाखवणारी घटना आता समोर आली आहे.

डोंबिवलीमध्ये एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ती घरकामाच्या बहाण्याने काम मिळवायची. त्यानंतर डुप्लिकेट चावी बनवून घरातील दागिन्यांची चोरी करायची. नेहा ढोलम असे तिचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने पोलिसांना तिला पकडण्यात यश आले आहे. नेहा डोंबिवली पुर्वच्या राजाजी पथजवळील रहिवासी आहे. पोलिसांनी तिच्याकडून रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहे. तिच्याजवळ पोलिसांना २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे.

राजाजी पथावर असलेल्या एका सोसायटीत राहणाऱ्या छाया प्रकाश साळवी यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. १२ ऑगस्टला छाया आणि त्यांचे पती सकाळी साडेआकराच्या सुमारास घरातून कामानिमित्त बाहेर पडले होते.

त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाली. ते पुन्हा घरी आले तर त्यांनी बघितले की घरातील रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी नेहा ढोलमला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी केली असता तिने चोरी केल्याचे कबूल केले आहे. ती सीमा गावडे असे खोटे नाव सांगून काम मिळवत होती, असेही तिने सांगितले आहे.

ती २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत काम करत होती. घरकाम करण्याच्या बहाण्याने तिने घरातील सदस्यांसोबत ओळख वाढवली होती. त्यावेळी तिने घराची बनावट चावी बनवून घेतली. त्यानंतर संधी पाहून घरातील रोकड आणि दागिने चोरी केले.

सीमाला दागिने आणि कपड्यांची खुप हौस आहे. पण सामान्य कुटुंबातील असल्यामुळे तिला ते मिळत नव्हते. तसेच तिचा पतीही सतत आजारी असल्यामुळे त्यालाही काही करता येत नव्हते. त्यामुळे आपली हौस पुर्ण करण्यासाठी तिने हा मार्ग निवडला. तिने याआधी देखील एका घरामध्ये चोरी केली होती.