पुण्याच्या कोथरुडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम हाच असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ते तिघे दहशवादी पुण्यात कोणता घातपात घडविण्यासाठी प्रयत्न करत होते का? याचा तपास केला जात आहे. स्थानिक पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) या यंत्रणा आता त्यांची चौकशी करत आहे.
दोन्ही तपास यंत्रणा फरार आलमचाही शोध घेत आहे. एटीएस त्या दहशतवाद्यांच्याच शोधात होती. त्या तिघांपैकी दोन दहशतवाद्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी त्यांना मध्यरात्री अटक केली आहे.
महंमद युनूस महंमद याकू साकी (२३) आणि महंमद इम्रान महमंद युसूफ खान (२४) असे त्या दोन तरुणांचे नाव आहे. दोघेही दीड वर्षांपासून कोंढवा येथे राहत होते. कोथरुड पोलिस ठाण्यातील शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांनी त्यांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे.
सोमवारी मध्यरात्री ते तिघेजण दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांनी ते बघितले. त्यावेळी आलम फरार झाला. चोरी करण्याच्या संशयावरुन युनूस आणि इम्रानला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण ते दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची उपसंघटना सुफाशी ते संबंधित होते. जयपूर येथे घातपात घडवण्याचा त्यांचा प्लॅन होता. आलमच्या इशाऱ्यावरुन हे दोघे काम करत होते. ते दोघेही पुण्यात ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. त्यांच्या घरी ड्रोनचे साहित्य सापडल्यामुळे ते ड्रोनच्या सहाय्याने घातपात करणार होते, असा संशय आहे. तसेच ते पुण्यावरही हल्ला करणार होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.