नितीन देसाई यांच्या निधनाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले होते. पण त्याआधी त्यांनी व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी काही व्यवसायिकांची नावे घेतली होती.
नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. कर्ज देणारी कंपनी त्यांच्यावर कर्ज लवकर भरण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. आता त्या कंपनीच्या मालकासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एडलवाइस कंपनीचे अधिकारी आणि प्रशासकांसह ५ जणांना याप्रकरणाता नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना ८ ऑगस्टला खालापूर पोलिस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच याप्रकरणाची जी काही कागदपत्रे असतील ती मागवण्यात आली आहे.
नितीन देसाई यांनी जीवन संपवल्यानंतर त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नितीन देसाईंना मानसिक त्रास देण्यात आला होता, त्यांच्यावर पैसे भरण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असे नेहा देसाई यांनी जबाबात म्हटले होते.
रसेश शाह, चेअरमन केयूर मेहता, स्मित शाह, ईआरसी कंपनीचे आर के बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांच्यावर नेहा देसाईंनी आरोप केला होता. १८१ कोटींचे कर्ज घेतले होते. २०२१ पर्यंत ८६ कोटींचे कर्ज फेडले होते. पण त्यानंतर ते आगाऊ हफ्ते मागत होते, असे नेहा देसाईंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते.
आता पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणातील सर्व कागदपत्रांचा पोलिस तपास करत आहे. त्यासाठी त्या आरोपींना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. तसेच एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार आणि अकाऊंटंट यांच्याकडूनही माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहे.