पत्नी बेशुद्ध पडली म्हणून उठवायला गेला अन् त्यानेही सोडला जीव; धक्कादायक कारण आले समोर, अकोल्यातील घटना

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शॉक लागून एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. आधी पत्नीचा मृत्यू झाला, नंतर पतीचाही मृत्यू झाला. एकाचवेळी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित घटना ही अकोला जिल्ह्यातील महान गावात घडली आहे. प्रभाकर बापूराव जानोरकर यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ते ७० वर्षांचे होते. तर त्यांची पत्नी निर्मला जानोरकर यांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता याप्रकरणी पिंजर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू आकस्मित झाल्याचे पोलिसांच्या नोंदीमध्ये म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलरचा शॉक लागल्यामुळे दोन्ही दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर हे शेतात गेले होते. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचे दार आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरात आवाज दिला, पण कोणी उघडला नाही.

प्रभाकर यांनी खिडकीतून पाहिले असता निर्मला या जमिनीवर पडलेल्या होत्या. त्यांना अनेकदा चक्कर यायची त्यामुळे त्या पडायच्या. प्रभाकर यांना वाटले की चक्कर आल्यामुळे निर्मला पडल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने मागील दरवाजा उघडला आणि आत गेले.

निर्मला यांना उचलण्यासाठी गेले असता प्रभाकर यांनाही विजेचा शॉक लागला. त्यामुळे ते देखील खाली कोसळले. त्यावेळी घराबाहेर जे लोक उभे होते. त्यांनी वीज पुरवठा बंद केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांचाही काही वेळाच्या अंतराने मृत्यू झाला आहे.