राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे त्यांच्यासोबत जाणारे नेते म्हणत आहे.
सकाळी झालेल्या मेळाव्यात आणि बैठकीतही अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असल्याचे दिसून आले आहे. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यातील बहुतांश आमदार अजित पवारांकडे गेले आहे.
दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, सुनिल शेळके, दत्ता भरणे, संजय बनसोडे, दिलीप मोहिते हे आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहे. पण पुण्यातील बहुतांश आमदारसोबत असतानाही अजित पवारांना एक मोठा धक्का बसला आहे.
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे एग्रिमेंट प्रशांत जगताप यांच्या नावाने आहे. त्यामुळे अजित पवार गटाची अडचण झाली आहे.
प्रशांत जगताप यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शहराध्यक्ष म्हणून कार्यालयाचे एग्रिमेंट माझ्या नावावर आहे. ते कार्यालय कोणी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तर मी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करेल. त्याचा ताबा कोणीच घेऊ शकत नाही, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत प्रशांत जगताप यांनी आपण शरद पवारांना साथ देणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रही लिहून दिले होते.