उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकताच दिल्ली दौरा केला आहे. त्या दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर चर्चांना आणखी उधाण आले आहे.
अशात अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे ट्विट केले होते. आता काही विरोधी पक्षातील नेतेही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आता यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्रिपद लवकरच अजित पवारांकडे जाणार असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अजित पवार हे १० ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. ही त्यांची फेअरवेल पार्टी तर नव्हती ना? कारण नवीन पद मिळाले तर अशी भेट होते. आता अशी भेट घेण्यामागे काहीच कारण नव्हते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज्याची राजकीय परिस्थिती बघितली तर भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायला तयार दिसत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते निवडणूका लढतील असे माझे आकलन आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
१० ऑगस्टपर्यंत कधीही अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना १६ आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागणार आहे. याचा परीणाम नेतृत्वावर होईल, असे मला वाटते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.