Pune News : शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शाहरुख खानला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. यामुळे ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. यामधून त्याने अनेकांची फसवणूक केली होती. शाहरुख खान असे आरोपीचे नाव आहे.
पुणे सायबर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली आहे. फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. फिर्यादींना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली होती.
राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफमध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किंमतीत विकत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगीतले.
फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्स्फर केली. मात्र फर्निचर काही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील अलवर या ठिकाणी पथक पाठवून राजस्थान बहादुरपूर गावातून शहारुख खानला अटक केली.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने देशातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळले असल्याची कबुली दिली आहे.