पोलिस असल्याचे सांगत घरात घुसले आणि तरुणाचे केले अपहरण, नंतर पत्नीला फोन केला अन्…; पुण्यातील घटनेने खळबळ

गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पोलिस असल्याचे सांगत काही जणांनी एका तरुणाचे अपहरण करुन खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यामध्ये अपहरण झालेल्या तरुणाची सुटका पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांनी तरुणाचे अपहरण करुन २५ लाखांची खंडणी मागितली होती.

पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. अक्षय कदम (२४) विजय नलावडे (२६), महेश नलावडे (२५), रणजित भोसले (२६), प्रदीप चव्हाण (२६), अमोल मोरे (३२) असे त्यांचे नाव आहे. ते सर्व सांगलीचे रहिवासी आहेत.

एनडी कोंढवे धावडे परिसरातून त्यांनी एका कारचालक तरुणाचे अपहरण केले होते. त्यामुळे तरुणाच्या पत्नीने पतीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हे सगळं समोर आले आहे.

तरुण हा कॅब चालवतो. तर अक्षय हा त्याच्या ओळखीचा आहे. अक्षयचा सोने-चांदी विक्रीचा व्यवसाय आहे. कारचालक तरुण हा त्याच्याकडे कामाला होता. पण आर्थिक व्यवहारातून काही वाद झाला होता. त्यामुळे गेल्या नोव्हेंबर महिन्यात तो तरुण आणि त्याची पत्नी पुण्यात राहण्यासाठी आले होते.

४ ऑगस्ट रोजी अक्षय आपल्या काही मित्रांना घेऊन तरुणाच्या घरी गेला आणि त्यांना आपण पोलिस आणल्याचे सांगितले. तेव्हा तरुण घरी नव्हता. जेव्हा तो घरी आला तर त्याला धमकवण्यात आले आणि जबरदस्तीने त्याला कारमध्ये बसवून नेण्यात आले.

ते लोक त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी तरुणाच्या पत्नीला फोन लावला. पतीला सुखरुप पाहायचे असेल तर तातडीने २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे तिला सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या पत्नीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार केली.

पोलिसांनी लगेचच त्या तरुणाचा आणि आरोपींचा शोध घेतला. तरुणाची सध्या सुटका झाली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस निरीक्षक किरण बालवडकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.