Rahul Narvekar: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे गटाला अधिकृत गट म्हणून मान्यता दिली. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. या निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.
“या निकालात मी संविधान, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाचे तंतोतंत पालन केले आहे. या निर्णयात कोणाला खुश किंवा नाराज करणे हे माझे ध्येय नव्हते. सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट होईल यासाठी हा निर्णय दिला आहे”, असे नार्वेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी काही निकष आहेत. मुळ राजकीय पक्षाचा व्हिपच आपल्याला ग्राह्य धरायला लागतो. तो व्हिप योग्यरित्या दिला गेला आहे का? हेदेखील तपासावे लागते. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हिप जरी आपण ग्राह्य धरला तरी तो व्हिप योग्यरित्या बजावला गेला आहे का? हे तपासणे गरजेचे होते.
माझ्या तपासानंतर लक्षात आले की, भरत गोगावले यांनी दिलेला व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्यरित्या बजावला गेला नाही. त्यामुळेच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही”, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी माझ्या निकालावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी माझा निकाल पूर्ण वाचावा. वाचल्यानंतर त्यांनाही माझा निकाल योग्य वाटेल, अशी आशा नार्वेकर यांनी व्यक्त केली. आता या निकालानंतर शिवसेना पक्षातील दोन गटातील संघर्षाचा मार्ग कसा मोकळा होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.