Rahul Narwekar : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही आदेशाची पायमल्ली करत आहात. सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या. विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक न्यायालयाने मान्य केले नाही. त्यांना नवीन वेळापत्रक देण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत.
याप्रकरणी पुढच्या निवडणूकापर्यंत तरी निर्णय घ्या. विधानसभा अध्यक्षपद घटनात्मक असले तरी आम्ही आदेश देऊ शकतो, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.
न्यायालयाने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडून येऊ शकलं नाहीतर मात्र, नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागेल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घेतला नाही तर विधानसभा अध्यक्षांसमोरील कारवाई निरर्थक ठरेल. अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.