पावसाळी पिकनिक ठरली जीवघेणी, कार 500 फूट दरीत, 7 तरुणांचा भीषण अपघात…

सध्या पावसाळ्यात अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. आता यवतेश्वर-कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या गाडीत त्यावेळी सातजण होते.

यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतरही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील हे सगळे होते. या घटनेने त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. सगळे कास पठारावर वर्षा सहलीसाठी गेले होते.

हे तरुण यवतेश्वर घाटात थांबले होते. याठिकाणी त्यांनी गाण्यावर एकत्र डान्सही केला होता. मात्र नंतर काही वेळातच ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे कारण अजून समजले नाही. गुरुवारी हे सगळे वर्षा सहलीसाठी कास पठारावर गेले होते. सायंकाळच्या सुमारास हे तरुण परत साताऱ्याकडे यायला निघाले होते.

दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा अपघातग्रस्त गाडीच्या पाठीमागे आणखी एक कार येत होती. यामुळे त्यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनी या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी यंत्रणा हलवून माहिती घेतली. शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या जवानांनी याठिकाणी येऊन मदत केली.

दरम्यान, यवतेश्वरजवळील गणेश खिंडीत हा अपघात झाला चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चारचाकी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली. 

या अपघाताची माहिती लगेच मिळाल्यामुळे मदतकार्य लगेच सुरू झालं. ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी करून दोराच्या साह्याने दरीत उतरून गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले. त्यानंतर सेफ्टी बेल्ट आणि इतर साधनांच्या साह्याने सर्व जखमींना दरीतून वर काढले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.