Ram Mandir : मनाची श्रीमंती! भिकाऱ्यांनी राम मंदिरासाठी दिलं ४ लाखांच दान, ट्रस्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासाठी देशभरातून देणग्यांचा ओघ सुरू आहे. रामभक्त आपल्या परीनं मंदिरासाठी दान करत आहेत. यामध्ये भिकारीदेखील मागे नाहीत. काशी आणि प्रयागराजमधील ३०० भिकाऱ्यांनी राम मंदिरासाठी साडे चार लाख रुपये दान केले आहेत.

दररोज भीक मागून साठवलेले पैसे भिकाऱ्यांनी राम मंदिरासाठी मोठ्या भक्तीभावाने दिले. या भिकाऱ्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रण देण्याची तयारी ट्रस्टकडून सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा पूजन सोहळ्याच्या व्यवस्थापनासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीचे सदस्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी माहिती दिली की, काशी आणि प्रयागराजमधील अनेक भिकाऱ्यांनी मिळून मंदिरासाठी साडे चार लाख रुपये दान केले आहेत. त्या सगळ्यांना मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रित केले जाईल.

अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात २२ जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यावेळी गाभाऱ्यात केवळ ५ जणांना प्रवेश असेल. यज्ञाचे यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. त्यांच्याशिवाय उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास कार्यक्रमाला हजर असतील.

राम मंदिरासाठी भिकारींनी केलेल्या दानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या दानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या भिकारींनीही आपल्या मनातील भक्तिभावाने राम मंदिराच्या बांधकामासाठी मदत केली आहे. हे दान राम मंदिराच्या बांधकामाला आणि हिंदू धर्माला एक नवी प्रेरणा देणारे आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी जगभरातील रामभक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता. या रामभक्तांमध्ये अनेक मुस्लिमांचाही समावेश होता. अशा स्थितीत रामाचा सुमारे ५०० वर्षांचा वनवास संपत असताना या ऐतिहासिक क्षणाची सर्वजण वाट पाहत आहेत.