अजित पवार यांच्या सत्तेत जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच राज्यातील लोकांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्ते करत आहे. काही ठिकाणी तर याचे पोस्टरही लावण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडत आहे. काही नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहे. आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत एक मोठा दावा केला आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, ही काळ्या दगडावरची कोरलेली रेघ आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. आधी सोबत असताना राज ठाकरेंचा प्रस्ताव मी उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो. पण उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातूनच राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विरोध आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊच शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. एकदा मी राज ठाकरेंसोबत युती करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो. पण त्यांच्या घरच्यांचा याला विरोध आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
तसेच राज ठाकरे हे खुप आधीपासून शिवसेनेसाठी काम करत होते. उद्धव ठाकरे हे खुप नंतर राजकारणात आले होते. ते आयत्या बिळावर नागोबा आहेत. खऱ्या अर्थाने पक्ष वाढीसाठी राज ठाकरे यांनी मेहनत घेतली होती. त्यांनी अनेक सभाही घेतल्या होत्या, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण खुप बिघडले आहे. त्यामुळे कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एका कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब ठाकरेंची शेवटची इच्छा हीच होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावे.