रतन टाटा हे उद्योगपती फक्त आपल्या देशातच नाही, जगभरात प्रसिद्ध आहे. संपुर्ण देशभरात त्यांचा सन्मान केला जातो. आता त्यांना महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. याचा पहिला पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
तसेच महाराष्ट्र उद्योरत्न पुरस्कारासह तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीला चालना देण्यासाठी सरकार काम करत असल्याचे त्या्ंनी सांगितले.
उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक गुरुवारी मंजुर करण्यात आले. त्यानंतर विधान परिषदेत सामंतांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्यातील उद्योगांना पुढे नेण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. सरकारने उपाययोजनांमुळे ११ महिन्यांत १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक राज्यात आणली आहे. इतकी मोठी गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे, असे उदय सामंतांनी म्हटले आहे.
राज्यातील प्रकल्प गुजरातला चालले अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. त्यालाही उदय सामंतांनी उत्तर दिले आहे. विदर्भ, मराठवाडा भागात मोठी औद्योगिक गुंतवणूक होत आहे. तसेच महाड आणि रत्नागिरीला प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवला जाणार आहे, असेही उदय सामंत यांंनी म्हटले आहे.