आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर

जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

जयपूरवरुन मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या रेल्वेत आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा गोळीबार झाला. गोळीबार करणारा एक कॉन्स्टेबलच होता. चेतन सिंग असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ज्या चार जणांचा यात मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बोरिवली येथे उतरवण्यात आले असून पोस्ट मॉर्टमसाठी ते पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून चेतन सिंग याची चौकशी केली जात आहे.

चेतनने आपल्या सर्व्हिस रिवॉल्वरने गोळी मारली आहे. चेतनची नुकतीच बदली झाली होती. त्यामुळे तो संतापलेला होता. त्याची मानसिकस्थिती ठिक नव्हती. तो आधी गुजरातमध्ये कार्यरत होता, असे चौकशीतून समोर आले आहे.

गुजरातमध्ये कार्यरत असताना त्याची अचानक मुंबईला बदली करण्यात आली. त्यामुळे तो खुश नव्हता. त्याच्या या बदलीमुळे त्याच्या कौटुंबिक आयुष्यात अडचण निर्माण झाली होती. या बदलीचा त्याला खुप त्रास होत होता.

चेतनची मानसिकस्थिती खराब झाली होती. त्यामुळे त्याने त्याचे वरिष्ठ टीका राम यांना गोळी मारली आणि त्यानंतर तीन प्रवाशांनाही त्याने गोळी मारली. त्यानंतर काही वेळ तो रिवॉल्वर घेऊन डब्यामध्ये फिरत होता. काही वेळाने त्याने चेन ओढली आणि रेल्वेतून खाली उडी मारत पळ काढला.

अखेर पोलिसांनी चेतन सिंगला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याची बोरिवली येथील पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. मानसिक तणावातूनच त्याने हा गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे.