रोहित बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त केला, रागात थेट डोक्यात…; भयंकर घटनेने सगळेच हादरले..

सध्या आयपीएल सुरू झाली असून यामध्ये आपण बघतो की चाहते आपल्या टीमला सपोर्ट करताना काहीही करत असतात. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. हणमंतवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सीएसकेचे चाहते बंडोपंत बापूसो तिबिले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बळवंत महादेव झांजगे आणि सागर सदाशिव झांजगे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, गल्लीतील एका घरात आयपीएलचा सामना ते पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सने चाहते असून, हैदराबाद संघाने धावांचा डोंगर उभा केल्याने ते रागात होते. रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले तिथे आले. यावेळी ते यांना हिनवू लागले. आता मुंबई जिंकणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

याचा राग आल्याने बळवंत झांजगे यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. त्याचवेळी सागर याने डोक्यात फळी घातल्याने तिबिले जागीच बेशुद्ध पडले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी बळवंत तिबिले यांचे भाऊ संजय बापूसो तिबिले यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या सामन्यादरम्यान किरकोळ कारणावरून दोन संघांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलीसही चक्रावले. पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार अधिक तपास करत आहेत. यामुळे मात्र एखादा सामना आपली टीम जिंकली नाही तर वादातून भयंकर घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, रोज गुण्यागोविंदाने राहणारे सख्खे शेजारी आयपीएलमधील दोन संघाच्या चुरशीने भिडले. यातून घडलेल्या दुर्घटनेमुळे तिघांचे आयुष्य उद्धवस्त  होण्याची वेळ आली आहे. यामुळे या गोष्टी किती मनावर घ्यायच्या ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.