डीजेवर नाचल्याने मृत्यू झाल्याची अफवा, पुण्यात २३ वर्षीय तरुणाच्या निधनाचे दुसरेच कारण समोर

पिंपरी चिंचवड येथे एक तरुण दुकानाजवळ चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे समोर आले. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत डीजे समोर नाचताना त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

असे असताना आता याबाबत खरी माहिती समोर आली आहे. योगेश साखरे याला बीपीचा त्रास होत होता. तो हिंजवडी येथील डॉक्टरांकडे निदान करण्यासाठी गेला होता. तो कुठल्याही डीजे समोर नाचत नव्हता. त्याच्या आसपास कोणताही डीजे नव्हता.

त्याने जवळ असलेल्या मित्रांना सांगितले की, मला चक्कर येत आहे. नंतर तो खाली जमिनीवर पडला. त्यानंतर मित्रांनी त्याला जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला रुबी हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याचा सांगितले.

त्याठिकाणी त्याला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांकडून यात सत्यता समोर आणली आहे. योगेश अभिमन्यू साखरे (वय 23, रा. मारुती मंदिरासमोर हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, याबाबत गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली. याबाबत माहिती काही मिनिटातच सगळीकडे पसरली. यामुळे पोलिसांनी याबाबत सखोल माहिती घेतली.

डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती क्षणार्धात पसरली होती. मात्र हिंजवडी पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती मिळाली असता संबंधित तरुण कोणत्याही डीजे समोर नाचत नसल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत.