SA vs IND : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला. कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारताने आक्रमक फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 201 धावांचे लक्ष्य ठेवले. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 95 धावांवर रोखला गेला, त्यामुळे भारताने 106 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकन संघ सुरुवातीलाच विस्कळीत झाला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला रीझा हेंड्रिक्स 8 धावा करून स्वस्तात बाद झाला आणि मॅथ्यू ब्रेट्झके 4 धावा करून बाद झाला.
मात्र, कर्णधार एडन मार्करामने काही मोठे फटके खेळून आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याचा प्लॅन रवींद्र जडेजाने उधळला आणि मार्करामला 13 चेंडूत 25 धावा करून बाद व्हावे लागले.
दुसऱ्या टोकाला डेव्हिड मिलर ठीक राहिला, त्याला नॉन स्ट्राईकवरील कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. मिलरने 25 चेंडूत 35 धावांची झुंजार खेळी खेळली, पण संघाला विजयाचा उंबरठा ओलांडता आला नाही.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चमक पाहायला मिळाली. पहिले षटक टाकायला आलेल्या मोहम्मद सिराजने मेडन षटक टाकले. गोलंदाजीत त्याला विकेट मिळाली नाही तेव्हा त्याने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला 8 धावांवर धावबाद केले.
फिरकी गोलंदाजांच्या तालावर आफ्रीकन फलंदाजांची दमछाक पाहायला मिळाली. कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी करत 5 बळी घेतले. तर जडेजाला 2 आणि मुकेश-अर्शदीपला 1-1 विकेट मिळाली.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात शानदार शतक झळकावले. सूर्याने जलद खेळी करत 56 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यावेळी सलामीवीर यशस्वी जैस्वालने त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ दिली.
जैस्वालने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या दोन खेळाडूंमध्ये 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करू शकला. गिल 12 आणि रिंकू 14 धावा करून स्वस्तात बाद झाला.