“टोमॅटो मिळाला नाही तर कोणी टाचा खुडून मेले का? भाववाढीवरून आक्रोश करणाऱ्यांना सदाभाऊंनी झापले

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांवर फेकले होते. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता टोमॅटोचे भाव हे गगनाला भिडले आहे. त्यामुळे देशभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

विविध स्तरातून टोमॅटोच्या भावावर प्रतिक्रिया येत आहे. सध्या टोमॅटो १५० ते १६० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाची चिंता वाढली आहे. यासाठी लोक सरकारला जबाबदार धरत आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सदाभाऊ खोत यांनी टोमॅटो दरवाढीवरुन आक्रोश करणाऱ्या शहरी लोकांना फटकारले आहे. टोमॅटो मिळाला नाही म्हणून दोन-चार लोकं मेलीत का? असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच टोमॅटोच्या दरवाढीला समर्थन दिले आहे.

टोमॅटो आता स्वीस बँकेत ठेवायला हवा. रयक क्रांती संघटनेने महाविकास आघाडीच्या काळात दुध आणि बैलगाडी आंदोलन केले होते. आता आमचं सरकार असूनही आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रथयात्रा काढली होती, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

टोमॅटो काही बॉम्ब नाही. जरा दोन तीन महिने थांबा. त्यानंतर ज्याला ज्याला टोमॅटो लागतात त्यांच्या सरणाला पण आम्ही टोमॅटो देऊ. तिथे मग लाकडं वापरुच नका. जाळण्यासाठी फक्त टोमॅटोच वापरा, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शहरी लोकांना फटकारले आहे

२०१४ पूर्वी मी सांगितलं होतं की कांदा परवडत नसेल तर टोमॅटो खा. आता सांगतो टोमॅटो परवडत नसेल तर कांदा खा. जेव्हा टोमॅटो स्वस्त होईल, तेव्हा घरात बॅरेल भरुन ठेवा. शेतकऱ्याची जी वस्तु महागली आहे. तिच्या नावाने असा दंगा केला नाही पाहिजे. आधी टोमॅटो स्वस्त झाला होता, तेव्हा कोणी बोललं नाही. आता भाव वाढला तर सगळे बोलताय, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.