राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अजित पवारांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे दोन गट पडले आहे असे असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही एक धक्का बसला आहे.
मनसेच्या मुंबईतील एकमेव नगरसेवकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनेसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुरडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती, त्यावेळी मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी ६ नगरसेवक हे शिवसेनेत गेले. पण संजय तुरडे हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहत आपले कर्तव्य बजावत होते. पण आता त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
संजय तुरडे यांची राज ठाकरेंचे एक निष्ठ म्हणून अशी ओळख होती. कारण ६ नगरसेवक गेले असतानाही ते राज ठाकरेंसोबत होते. पण आता त्यांनी राज ठाकरे यांना भेटून राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण पक्ष सोडतोय, असे संजय तुरडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील लोकंही राज्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करत आहे. तर अनेकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे, असे म्हटले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे बॅनर लागलेले आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. मनसे नेत्यांनीही राज ठाकरेंना याबाबत आवाहन केल्याची चर्चा आहे.