Sandeep Lamichhane found guilty : नेपाळ संघाचा स्टार क्रिकेटर संदीप लामिछानेचे क्रिकेट करिअर धोक्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, नेपाळ न्यायालयाने स्टार फिरकी गोलंदाजाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
एका १७ वर्षीय तरुणीने नेपाळ संघाचा कर्णधार असलेल्या संदीपवर आरोप केला होता की, क्रिकेटरने तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळ न्यायालयाने संदीप लामिछानेला दोषी ठरवले आहे. संदीपवर काठमांडू जिल्हा न्यायालयाने १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्याची सुनावणीपूर्व कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, २० लाखांच्या जामीनावर संदीपची सुटका करण्यात आली. बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती.
संदीप लामिछानेची जामिनावर सुटका झाली असून या काळात त्याने देशाच्या वतीने अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतला. संदीपचे क्रिकेट करिअरही आता धोक्यात आले आहे. मात्र, संदीपच्या शिक्षेबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
संदीपच्या शिक्षेबाबत पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. संदीप लामिछानेने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी नेपाळसाठी १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
2018 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संदीपने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच टी-20 इंटरनॅशनलमध्ये या फिरकी गोलंदाजाने 52 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत.
संदीप लामिछाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला आहे. संदीपने 2018 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने पदार्पण केले.
संदीपने या लीगमध्ये एकूण दोन हंगामात भाग घेतला आणि एकूण 13 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तथापि, 2019 पासून, कोणत्याही संघाने त्याला आयपीएलमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.