साप चावल्यावर ४/४ दवाखाने फिरूनही उपचार न मिळाल्याने १२ वर्षीय चिमुकलीने तडफडत सोडला जीव

रायगडच्या पेण तालुक्यातील एका लहान मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सारा ठाकूर असे तिचे नाव असून ती फक्त १२ वर्षांची होती. तिच्या अशा जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित घटना ही जिते गावातील आहे. सारा ठाकूरला साप चावला होता. पण वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. तिला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला होता.

सर्पदंशानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. पण वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबाने तिला पेणच्या एका खाजगी रुग्णालयात नेले होते. त्यानंतर त्यांनी जवळपास चार रुग्णालये बदलली. पण उपचार मिळाले नाही.

साराला आधी पेणच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण आयसीयू रुमअभावी तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात तिला नेण्यात आले होते. त्यानंतर तिला कळंबोली येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण योग्यवेळी तिला उपचार मिळाला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. साराच्या मृत्यूमुळे संपुर्ण परीसरात शोककळा पसरली आहे.

साराच्या मृत्यूला आरोग्य प्रशासन दोषी आहे. त्यांच्यामुळे आम्ही सारा गमावली, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. तर पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. राजूपत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

साराला रात्री दोन वाजता रुग्णालयात आणण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर होती. तिला उलट्या होत होत्या. त्यामुळे तिच्या शरीरातील विषाची मात्रा कमी करण्यासाठी आम्ही तिच्यावर योग्य ते उपचार केले होते. पण तिची प्रकृती गंभीर होती. तसेच रुग्णालयात आयसीयू रुम नसल्यामुळेआम्ही तिला अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सांगितले होते.

दरम्यान, साराच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सारा ही सातवीत शिकत होती. ती शाळेतील शिक्षकांची आवडती विद्यार्थीनी होती. पण आता यापुढे तिला बघता येणार नाही, त्यामुळे त्यांचेही अश्रू अनावर झाले होते.