अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराची माघार, सांगीतलं त्यादिवशी नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या सोबत जात अनेक आमदारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ४० आमदारांच्या सह्याही अजित पवारांकडे होत्या. अशात आधी अजित पवारांना पाठिंबा देऊन नंतर माघार घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आमदार सरोज अहिरे यांनी आधी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. तसेच त्या राजभवनात शपथविधीलाही उपस्थित होत्या. पण त्यानंतर त्या शरद पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मी दोन्ही गटातील नेत्यांशी भेटून आले आहे. माझ्यासाठी अजित पवार आणि शरद पवार हे एकच नाणं आहे. मी पक्षासोबत आहे. राष्ट्रवादीच माझा परिवार आहे. मी सर्व लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे, असे सरोज अहिरे यांनी म्हटले आहे.

तसेच शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहे. माझे ते आदरणीय आहे. तर मला तिकीट देणं, मला माझ्या मतदार संघासाठी निधी देणं, ही सर्व मदत मला अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या उपकाराची जाणीवही मला आहे. त्यामुळे माझी मानसिक अवस्था खराब झाली आहे. माझी विनंती आहे की दोन्ही गटांनी यावर तोडगा काढावा, असे अहिरे यांनी म्हटले आहे.

शपथविधीला उपस्थित असण्याबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांकडे मी माझ्या मतदार संघातील कामानिमित्त गेले होते. मला तिथे बोलवण्यात आलं होतं. तिथे सर्व आमदार सह्या करत होते. त्यामुळे मी सुद्धा सही केली. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, त्यामुळे मी सही केली, असे अहिरे यांनी म्हटले आहे.

आता माझं दोन्ही गटातील नेत्यांशी बोलणं झालं आहे. पण मी जनतेच्या मतावर आमदार झाले आहे. मी आता मतदार संघाचा कौल घेईल, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन आणि त्यानंतर माझा निर्णय घेईल, असेही अहिरे यांनी म्हटले आहे.