काल जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे या घटनेचा राज्यात निषेध करण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे.
आता या घटनेचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने स्वतःचीच गाडी पेटवून दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वत:ची चारचाकी कार जाळून लाठीमाराच्या घटनेचा निषेध केला. फुलंब्रीतील पाल फाटा येथे भर रस्त्यात हा प्रकार घडला. यामुळे वाहतूक बंद होती. याबाबत ते म्हणाले, दुसऱ्या समाजावर अन्याय झाल्यावर सर्वात आधी समोर येणारे आम्ही, आमच्या आई बहिणीवर अत्याचार झाल्यावर शांत बसणार नाही.
आमच्या आई बहिणींच्या डोक्यात तुम्ही काठ्या टाकल्या, त्यांना रक्तबंबाळ केल, याचसाठी अट्टाहास केला होता का स्वराज्याचा, याच साठी का ४० दिवस यातना सहन केल्या का माझ्या शंभूराजानं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे।
तसेच ते म्हणाले, हात मोडले, पाय तोडले, डोळे काढले, कान कापले, गर्दन छाटली, याच साठी अट्टाहास केला होता का? आता मराठा समाज शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड व गेवराई तालुक्यातील १२३ गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. नंतर त्यांनी उपोषण सुरू केले होते.
त्यांना मोठा पाठिंबा मिळत होता. नंतर वाढलेली, गर्दी पाहून तसेच आंदोलकांच्या तब्येतीची स्थिती लक्षात घेता त्यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. आंदोलकांनी नकार दिल्यानंतर सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.
यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. अनेकांच्या डोक्याला डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.