२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे.
कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएचे सरकार येणार असे सांगण्यात आले आहे.
मोदी सरकारला सत्तेत काढून काढण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एक आघाडी तयार केली आहे. इंडिया आघाडी असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. या आघाडीनेही मोठी झेप घेतल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.
सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरस ठरताना दिसून आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीला महायुतीला चांगली कामगिरी करता येणार नसल्याचे चित्र सर्व्हेतून समोर आले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंना मोठा फटका बसणार असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.
देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीएला ३०६ जागा मिळणार आहे. तर इंडिया आघाडीला १९३ जागा मिळणार आहे. तर इतरांना ४४ जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपला देशभरातून २८७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज होता, पण यावेळीही काँग्रेसला १०० चा आकडा पार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला अवघ्या ७४ जागा मिळणार आहे. तर इतरांना १८२ जागा मिळतील.
राज्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे बंड झाले. त्याचा महायुतीला फायदा होणार असे म्हटले जात होते. पण याचा महाविकास आघाडीलाच फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लगेच निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीला २८ जागा तर महायुतीला २० जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वात जास्त नुकसान एकनाथ शिंदे यांच्या गटाचं होणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे आणि अजित पवार गटाचे मिळून फक्त ५ खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. तर भाजपचे १५ खासदार निवडून येतील, असे समोर आले आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे १०, तर ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे मिळून १८ खासदार निवडून येतील असेही समोर आले आहे.